पुण्यातील रिसॉर्टमध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू; पालकांना 1.99 कोटी देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश
केरळ येथून पुण्याच्या रिसॉर्टमध्ये आलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तीन वर्षानंतर ग्राहक हक्क समितीने पुण्यातील एका रिसॉर्टला मृतांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Pune News : कोची येथील एका ग्राहक हक्क समितीने पुण्यातील एका रिसॉर्टला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे आपले दोन मुल गमावलेल्या जोडप्याला 1.99 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील या साहसी रिसॉर्टला कोची येथील ग्राहक हक्क समितीने सुरक्षेच्या उल्लंघनामुळे आपल्या दोन्ही मुलांना गमावलेल्या जोडप्याला 1.99 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 25 ऑक्टोबर 2020 रोजी, रिसॉर्टमध्ये जोडप्याच्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता.
मिधुन प्रकाश (30) आणि निधी प्रकाश (24) यांचा 25 ऑक्टोबर 2020 रोजी रिसॉर्टमध्ये झालेल्या अपघातात तलावात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलांच्या आई वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता ग्राहक हक्क समितीने पुण्यातील रिसॉर्टला मिधुन आणि निधीच्या आई वडिलांना नुकसान भरपाई म्हणून 1.99 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पी व्ही प्रकाशन आणि त्यांची पत्नी वनाजा यांनी पुण्यातील करंदी व्हॅली या साहसी आणि कृषी पर्यटन रिसॉर्टच्या मालकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एर्नाकुलम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने हा भरपाईचा आदेश दिला आहे.
मृत्यू होण्याच्या एक दिवस आधी मिधुनने स्वत:सह त्याचा भाऊ आणि इतर 22 जणांसाठी खोल्या बुक केल्या होत्या. पालकांनी आरोप केला की रिसॉर्टच्या मालकांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये मार्गदर्शक सूचनांसह सुरक्षा उपायांचे आश्वासन दिले होते. पण दोघेही बुडताना रिसॉर्टचे कोणीच तिथे नव्हते. सुरक्षेचा अभाव, सूचनाफलकांचे नसणे आणि चालत नसलेले सीसीटीव्ही यांच्यामुळे मुलांचा दुःखद मृत्यू झाला असा आरोप पी व्ही प्रकाशन यांनी केला होता.
या घटनेनंतर राजगड पोलिसांनी रिसॉर्ट आणि व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. पालकांनी सुरुवातीला 6 कोटी रुपयांची मागणी केली. पण नंतर तक्रारीच्या तारखेपासून 12 टक्के व्याजाच्या रकमेसह 1.99 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष डी. बी. बिनू यांच्या नेतृत्वाखालील आणि सदस्य व्ही. रामचंद्र आणि श्रीविध्या टी. एन यांचा समावेश असलेल्या ग्राहक खंडपीठाने याप्रकरणी निकाल दिला आहे. खंडपीठाने विरोधी पक्षांना नोटीस पाठवली होती. मात्र, या नोटिसा परत पाठवण्यात आल्या. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांचे म्हणणे मांडण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
"मृत मुले अविवाहित असल्याने आणि कुटुंबियांकडे उत्पन्नाचा मार्ग नाही. तक्रारदारांनी मुलांच्या अकाली मृत्यूमुळे प्रेम, आपुलकी, सहवास, आर्थिक पाठबळ आणि बरेच काही गमावले आहे. तक्रारकर्त्यांच्या मुलांच्या दुःखद मृत्यूसाठी, निष्काळजीपणा झाल्यामुळे नुकसानभरपाई म्हणून 1.99 कोटी रुपये विरुद्ध पक्षांना देण्याचे आदेश देत आहे," असे खंडपीठाने म्हटलं आहे.