हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : गणेशोत्सवात (ganeshotsav 2023) पुण्यातून (Pune) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. गणपतीसाठी केलेल्या सजावटीसाठी (Decoraction) केलेल्या विद्युत रोषणाईमुळे एका व्यक्तीचा अत्यंत भीषण मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमध्ये शॉर्टसर्किट (short circuit) झाल्याने शॉक लागून गणेशभक्ताचा रात्री झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेड तालुक्यातील खरपुडीत घरगुती गणपती सजवटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट झाल्याने शॉक लागून तरुणाचा रात्रीच्या झोपेत होरपळून मृत्यू झाला.  खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात वीजेचे शॉटसर्कीट झाल्याने झोपेतच तरुणाचा जीव गेला आहे. वैभव जगन्नाथ गरुड (वय 35 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खरपुडी येथील दत्तनगरमध्ये मयत वैभव गरुड हे कुंटुंबासह राहत होते. गरुड यांनी घरात गणपती बसवून मूर्तीसमोर आकर्षक सजावट केली होती. या सजावटीमध्ये इलेक्ट्रिक लाईटच्या माळा लावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात लावलेल्या इलेक्ट्रिक लाईटच्या माळांमध्ये शॉटसर्कीट होऊन आग लागली. काहीवेळातच घरात आग वेगाने पसरली. काही कळण्याचा आतच आगीने रौद्ररुप धारण केले. घरातील साड्या व इतर वस्तू जळून खाक झाल्या. त्यावेळी गादीवर झोपलेल्या वैभव गरुड यांचा जळून मूत्यू झाला. आगीमुळे त्यांना घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.


वैभव हा सर्पमित्र म्हणून खेड तालुक्यात प्रसिद्ध होता. अनेकदा त्याने जीवावर उदार होऊन अनेकांचे प्राण वाचवले आणि सर्पांना जीवनदान दिले. मात्र त्याचा अशाप्रकारने मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैभवच्या मागे पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. तिघेही दुसऱ्या खोलीत झोपल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. मात्र त्यांच्या घरातील कर्ताधर्ता पुरुषच निघून गेला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.