पुण्यात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा शिक्षक गजाआड
शिक्षकाने वर्गात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने वर्गात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे. ६ महिन्यांपासून मधल्या सुट्टीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी विक्रम पोतदार नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ मे या दिवशी हा प्रकार उघड झाला आहे.
पोतदार मुलींना एकटे गाठून त्यांचा विनयभंग करत होता. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. दोन मुली रडत असल्याचे दुसऱ्या एका शिक्षकाने पाहिले आणि त्या मुलींशी संवाद साधायला एका महिला शिक्षिकेला सांगितले. त्यानंतर हा प्रकार पुढे आला.
सुरूवातीला पोतदारने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. अभ्यास न केल्याने या मुलींना आपण रागावलो होतो त्यामुळे त्या रडत असल्याची बतावणी त्याने केली होती. शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही त्याने केला.