निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे :  मृत्यूनंतर सगळं संपतं असं म्हणतात. कधीकधी मृत्यूनंतरही उपेक्षा थांबत नाही, असंच घडतंय पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत. अग्नीसंस्कार उरकल्यानंतर अनेकांचा त्यांच्या नातलगांना विसरच पडलाय. अखेर स्मशानभूमीतील कर्मचारीच ही परवड थांबवताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मृत्यू म्हणजे पूर्णविराम नाही, अल्पविराम आहे अशी पाटी आहे. पण या अल्पविरामानंतरही काही जणांच्या नशिबी उपेक्षाच येते.


असेच काही अभागी जीव मृत्यूनंतरही त्यांच्या जीवनातील परवड संपलेली नाही. अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नदीमध्ये अस्थी आणि रक्षा विसर्जित करायची असते. मात्र यांचे नातलग अस्थीकलश न्यायला आलेलेच नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून वैकुंठ स्मशानभूमिच्या एका खोलीमध्ये या अस्थी अंतिम मोक्षाच्या प्रतिक्षेत आहेत.


या खोलीमध्ये नाव-गावासकट अस्थी बांधून ठेवल्या जातात. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर इथले कर्मचारीच अस्थीविसर्जन करतात. 


याची कारणं वेगवेगळी असतील. काहींचं पटत नसेल, काहींना वेळ नसेल, काहींना अस्थि विसर्जन ही अंधश्रद्धा वाटत असेल. असं असलं तरी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना हे काम करावं लागतंय. नात्यांमध्ये येत असलेला दुरावा आणि बदललेली जीवनशैली याचाही हा परिणाम असू शकतो.


मृत्यूनंतर काय होतं कुणी पाहिलंय? मात्र अस्थिविसर्जनानं मुक्ती मिळते म्हणे. यामागची श्रद्धा-अंधश्रद्धा जी काही असेल ती असो, पण रितीनुसार अंत्यसंस्कार केले असतील, तर हे शेवटचं कार्यही कुटुंबीयांनीच पार पाडायला हवं. त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?