Pune Central Railway Speed: पुणे विभागामध्ये रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्यासाठी मागील काही दिवसांपासून पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सिग्नलिंग काम, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, लोहमार्गांची संख्या वाढविण्याबरोबरच इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आले. ही कामे पूर्ण झाल्यामुळे पुणे विभागातील रेल्वे गाड्यांचा कमाल वेग आता ताशी 100 वरून 110 किलोमीटर प्रतितासवर पोहोचला आहे.


महत्त्वाच्या सुधारणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेकडून गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सुधारणांच्या माध्यमातून काही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. प्रवासासाठी कमी वेळ लागावा आणि प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी आणि त्यांना उत्तम सेवा प्रदान करता यावी यासाठी मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्नशील आहे. याच धोरणाला अनुसरुन रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे केली जात आहेत.


जुन्या यंत्रणा बदलण्याचंही काम


लोहमार्गांची संख्या वाढविणे, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, सिग्नलिंगचे कामावर भर दिला जात आहे. या मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा केल्यास गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल या उद्देशाने कामं हाती घेतली जात आहे. दर्जेदार पद्धतीने लोहमार्गांची देखभाल रेल्वेकडून केली जाते. अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याबरोबरच जुन्या यंत्रणा बदलण्याचे कामही प्राधान्याने करण्यास रेल्वेचे प्राधान्य आहे.


कोणत्या मार्गावरील वेग वाढला?


पुणे विभागात रेल्वे गाड्यांच्या कमाल वेगात वाढ झाली आहे. पुणे ते साताऱ्यादरम्यान रेल्वेचा वेग ताशी 110 किलोमीटर झाला आहे. तसेच सातारा ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर या मार्गावरील वेग ताशी 110 किलोमीटरवर पोहोचला आहे.


सर्व तपासण्यानंतरच वाढवला वेग


सुरक्षेसंदर्भातील सर्व काळजी घेत आणि  तपासणी करुन वेग वाढवण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण तांत्रिक तपासणी केल्यानंतरच रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आला आहे. गाड्यांचा वेग वाढल्याने वक्तशीरपणा सुधारण्यात मदत होणार आहे. याचबरोबर प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असल्याने या स्थानिक स्तरावरील सुधारणांचा परिणाम पुण्यातून ये-जा करणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांवर होणार आहे.


गाड्यांचा वेग वाढवल्याचे 5 फायदे


– गाड्यांची संख्या वाढविता येणार


– वेगवान प्रवासामुळे प्रवाशांकडून प्रतिसाद वाढणार


– अधिक जलद प्रवास


– प्रवासाच्या वेळेत बचत


– गाड्यांचा वक्तशीरपणा वाढणार