अरुण मेहेत्रे, झी २४ मीडिया, पुणे : पुण्यातील चांदणी चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच म्हणावा लागेल. त्यातून सुटका करण्यासाठी दुमजली उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला. मात्र भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटली तरी अजूनही उड्डाणपूल पूर्ण झालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदणी चौकात कुठल्याही ठिकाणी केवळ पाच मिनिटं उभं राहा. या पाच मिनिटांत किमान पन्नास वेळा तुमच्या काळजात धस्स होणार नसेल तरच नवल. एका बाजूने पुण्यात शिरण्यासाठी तीव्र उतार, तर दुसऱ्या बाजूने पुण्याबाहेर पडण्यासाठी तीव्र चढ. मधूनच वाहणारा बायपास हायवे आणि या हायवेला लागण्यासाठी कात्रीत सापडलेली वाहनं. तुम्ही पायी चला अथवा कुठलंही वाहन वापरा, तुम्हाला कायम जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागेल. या चौकात आजवर अनेकांचे बळी गेलेत. छोटे-मोठे अपघात ही तर नित्याचीच बाब. मात्र त्यांचं सोयरसुतक कुणालाच नाही. 


या समस्येवर उत्तर म्हणून चांदणी चौकात उड्डाणपूल उभारायचा पर्याय समोर आला. केंद्रीय रस्ते विकास तसंच वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्ट २०१७ रोजी उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजनही झालं. मात्र पुढे या कामाला म्हणावी तशी गती मिळालीच नाही. 



उड्डाणपुलाचं काम रखडल्याबद्दल खुद्द गडकरींनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पुणे महापालिकेकडून अडचणींचा पाढा वाचला जात आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन, जलवाहिन्या तसेच विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण त्याच प्रमाणे वृक्षतोडी साठी आवश्यक असलेली परवानगी या कारणांनी हे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ९५ टक्के जागा संपादित झाली असून उड्डाणपुलाचं काम लवकरच मार्गी लागणार असल्याचा दावा पालिका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय. 


चांदणी चौकातील उड्डाणपूल हा सुमारे चारशे कोटींचा प्रकल्प आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिका एकत्रितपणे हा दुमजली उड्डाणपूल उभा राहणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गेल्याच आठवड्यात या कामाचा आढावा घेतला. मात्र जोपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या समस्येतून पुणेकरांची सुटका होणे नाही.