अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुणे शहराला जसा इतिहास आहे, तसाच इतिहास पुणे या नावाला आहे. पुण्याला पुणे हे नाव कोणी दिलं किंवा ते नेमकं कसं पडलं याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीये. मात्र जे काही उपलब्ध आहे त्यावरून पुणे नावाची महती स्पष्ट होते. पुण्याच्या नामांतराविषयीची चर्चा सध्या सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे नावाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालशिवाजीला सोबत घेऊन जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवलेली भूमी म्हणजे पुणे... 
अटकेपार झेंडा रोवणाऱ्या पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी भूमी म्हणजे पुणे.. 
सामाजिक, राजकीय चळवळींचा वारसा जपणारी भूमी म्हणजे पुणे... 
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुणे... 
उदयोग व्यवसायाच्या भरभराटीचं केंद्र म्हणजे पुणे... 


ही झाली पुण्याची बहुआयामी ओळख. पुण्याची महती सांगणाऱ्या आणखी कितीतरी गोष्टींचा उल्लेख यात करता येईल...पण पुणे या नावाविषयीदेखील तितकीच उत्सुकता आहे. हे नाव केव्हापासून अस्तित्वात आहे, त्यात काही कालपरत्वे बदल झालेत का, त्याची काय कारणं आहेत हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. 


आजचं पुणे हे तसं विविध गावं आणि पेठांचा समूह आहे. पुण्याला पुणे हे नाव कशावरून पडलं याबाबत काही आख्यायिका आहेत. कुंभारवाड्यातील पुण्येश्वराचं देवस्थान ही त्यापैकीच एक आख्यायिका.


अभ्यासकांच्या मतानुसार पुणे या नावाविषयीचे संदर्भ अगदी आठव्या शतकात आढळून येतात. राष्ट्रकूट राजांच्या ताम्रपटांत 'पुण्यविषय', 'पूनकविषय'- म्हणजे पुण्याची पंचक्रोशी असे शब्द वापरण्यात आलेत. पुणे हा त्याचाच अपभ्रंश असू शकतो अशा स्वरूपाची एक मान्यता आहे. 


१३ व्या, १४ व्या शतकातील काही दस्तांमध्ये कुंभारी, कासारी यांसह पुणेवाडी असाही उल्लेख आढळतो. पुण्यावर औरंगजेबाची राजवट असताना त्यानं पुण्याचं नाव बदलून मुहियाबाद असं ठेवलं होतं. मात्र औरंगजेबाच्या पश्चात ते नाव पुसलं गेलं आणि पुन्हा पुणे हे 'पुणे' म्हणून नावारूपाला आलं. 


इतिहासतज्ज्ञ म. श्री. दीक्षित यांच्या 'असे होते पुणे ' पुस्तकात ही माहिती देण्यात आलीय. पुण्याला पुणे म्हणतात या आशयाचे असे अनेक उल्लेख ऐतिहासिक साहित्यकृतींमध्ये उपलब्ध आहेत. या साऱ्यांतून 'पुण्य' हा शब्द पुणे नावाच्या केंद्रस्थानी असल्याचं स्पष्ट होतं. 


उपलब्ध संदर्भांचा विचार करता पुणे या नावाला किमान एक हजार वर्षांचा इतिहास आहे. पुनक, पुनवडी, पुणेवाडी, पुणे- इथपासून ते आज अभिमानानं बोललं जातं ते 'पुण्यनगरी' इथपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास आज अचानकपणे वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय.