पुण्यात वाढत्या कोरोनामुळे कठोर नियमावली, वाचा काय सुरू काय बंद
पुण्यातही वाढत्या कोरोनामुळे कठोर पावलं उचलण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
पुणे: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यांनुसार आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. अमरावती, वर्ध्यानंतर आता पुण्यातही कोरोना वाढू नये म्हणून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
पुण्यासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनासंदर्भात मोठ्या प्रमाणात जगजागृती वाढवणार आहे. याशिवाय पुणे विभागातील कोरोना हॉटस्पॉट निश्चित करून तिथे सर्वेक्षण वाढवण्यावर भर देण्यात येईल. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कठोर निर्णय़ घेण्यात येत आहेत.
पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन 28 तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याशिवाय कॉलेजेस, खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहेत. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहेत.
पुण्यातील हॉटेल्स, बार, रेस्टोरेंट आता फक्त राञी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 6 पर्यंत अनावश्यक फिरण्यावर बंदी आहे. लग्नसमारंभ, संमेलन, खासगी कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम यावर निर्बंध घालण्यात आले असून फक्त 200 लोकांना यात सहभागी होण्याची परवानगी असेल. तर लग्न समारंभासाठी आता पोलिसांची परवानगी अत्यावश्यक असणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
दुसरीकडे अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 36 तासांचा वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं याचा फटका आता बाहेरून आलेल्या प्रवाशांना बसताना दिसत आहे. बस स्थानकासमोर प्रवासी सकाळपासून ताटकळत उभे आहेत.
वर्ध्यातही 36तासांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्ह्यात 36 तास केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. दरम्यान पेट्रोल पंप आणि वाहतूक व्यवस्थाही बंद राहणार आहेत. पुढील आदेशापर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यात 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यासही बंदी आहे. व्यापारी प्रतिष्ठानं संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिलेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत.