पुणे : भररस्त्यात फोडायचा महिलांची डोकी; दगडी गॅंगच्या म्होरक्याला शिवसैनिकांनी पकडलं
Pune Crime : पुण्याच्या वैदुवाडी येथे महिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका माथेफिरु आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत दहा महिलांची डोकी फोडली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारांवर वचक बसलेला नाही. अशातच महिलांवर दगडाने हल्ला करणाऱ्या एका माथेफिरुला पोलिसांनी अटक केली आहे. या माथेफिरुने आतापर्यंत 10 महिलांवर हल्ला करुन त्यांना जखमी केलं आहे. हा आरोपी नव्या कोऱ्या गाड्यांना देखील लक्ष्य करत होता. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याने स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. तसेच पोलीस इतके दिवस या आरोपीकडे दुर्लक्ष का करत होते असा आरोपही स्थानिक नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुण्याच्या हडपसरमध्ये वैदुवाडी येथे महिलांवर दगडफेक करुन त्यांना जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होता. त्यामुळे वैदुवाडी येथे धुमाकूळ घालणाऱ्या दगडी गॅंगच्या म्होरक्याला पाठलाग करून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे आणि तेथील स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. वैदुवाडी येथे पुलावर येण्यासाठी ब्रिजच्या खालून दोन रस्ते आहेत. आरोपी पुलाच्या जिन्याने वर येऊन भर रस्त्यात महिलांच्या डोक्यामध्ये तसेच वाहनांवरती हा आरोपी दगडफेक करत होता. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती.
योगेश नामदेव कांबळे (रा. वैदवाडी मार्तंड वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. वैदवाडी पुलावर गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेला हा प्रकार कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीविरुद्ध याआधीही गुन्हा दाखल झाला होता. त्यातून सुटल्यानंतर आरोपी हा पुन्हा अशा प्रकारचे हल्ले करुन निष्पाप महिलांना आणि नवीन गाड्यांना टारर्गेट करत होता. आरोपीने आतापर्यंत दहा महिलांना गंभीररीत्या जखमी केले होते. कुणाचा जीव गेल्यानंतर आरोपीवर कारवाई करून उपयोग नाही
दरम्यान, हडपसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध 307 आणि 326 ही कलमे लावलेली नाहीत. ही कलमे आरोपीवर लावली नाहीत तर पोलीस आयुक्तांची भेट घेऊ असे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी म्हटलं आहे. तसेच आतापर्यंत दहा महिलांची डोकं फोडले आहे, एका महिलेची कवटी तुटली आहे तरी पोलीस दुर्लक्ष का करत होते असा सवालही तुपे यांनी केला आहे.