सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: अनेकांना आपला राग नियंत्रणात ठेवता येत नाही. अशा व्यक्ती क्षुल्लक कारणावरुन प्रकरण कुठे नेऊन ठेवतील हे सांगता येत नाही. याचे परिणाम कधीच चांगले होत नाही. आपल्या राग नियंत्रणात न येण्याची सवय एखाद्याच्या जीवावर बेतते आणि पोलीस आपला खाक्या दाखवतात तेव्हा त्यांना आपली चूक कळते. राग अनावर झाल्याने थेट कोयत्याने हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील विमानतळ परिसरात हा प्रकार घडला. फ्री सिगारेट दिली नाही म्हणून संतप्त झालेल्या इसमाने हॉटेल चालकाला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं आहे.


या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे या 22 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पुणे येथील लोहंगावच्या मोझे आळी येथे राहतो. याबाबत हर्षल गुंजाळ यांनी फिर्याद दिली होती.


शुक्रवारी 14 जुलै रोजी पहाटे 4 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी फिर्यादी हॉटेल बंद करुन काम आवरुन हॉटेलच्या बाहेर फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादीकडे फ्री मध्ये सिगारेट मागितली.पण आता हॉटेल बंद झाले असल्याचे फिर्यादीने चेतन चितापुरे याला सांगितले. 


फ्री सिगारेट देत नाही नाही याचा राग चेतनला आहे. त्याने हा राग मनात धरुन कंबरेला लावलेले बोथट लोखंडी हत्यार काढले.  'तु मला ओळखले नाही, तू मला सिगारेट देत नाही? थांब तुला दाखवतो. आज तुझा गेम करतो' असे बोलून त्याच्यावर सपासप वार केले.  


जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कान, डोके, मान आणि उजव्या हातावर कोयत्याने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले आहे. यानंतर फिर्यादीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु करत आरोपीला अटक केली आहे.


पोलिसांकडून 577 गुन्हेगारांना अटक 


पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडे गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोंबींग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. यात पोलिसांनी जवळपास 577 गुन्हेगारांना अटक केली आहे.असं असलं तरी शहरातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. 


बसमध्ये दिवसाढवळ्या तरुणीचा विनयंभग 


पुण्यात दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर बसमधील सहप्रवाशांना मोठा धक्का बसला. पीएमपी प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याची घटना पौड रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याने याची भीषणता अधिकच असल्याचे दिसून येत आहे.अश्लील चाळे आणि गैरवर्तन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.