तब्बल 72 वर्षांनंतर पुण्यात... हॉटेल वैशालीची खरी मालकी कोणाकडे? `त्या` बाईंमुळं एकच खळबळ
Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असणारं सुप्रसिद्ध वैशाली हॉटेल वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हॉटेल वैशालीबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. बंदुकीच्या धाकावर या हॉटेलची पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेना केला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली (Hotel Vaishali)बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच ते स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप एका विवाहितेने केला आहे. इतकेच नाही तर लग्नाआधी पतीने स्वतःच्या घरी घेऊन जात दारू आणि ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचा आरोपही फिर्यादी महिलेने केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
विश्वजीत विनायकराव जाधव (वय 38), अभिजित विनायकराव जाधव (वय 40), विनायकराव जाधव (वय 65), वैशाली विनायकराव जाधव (वय 60) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 34 वर्षीय विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. जून 2018 ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी पती विश्वजीत याने फिर्यादीला 2018 मध्ये घुले रोड येथील राहत्या घरी नेत दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे . इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक आरोपही या महिलेने केला आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
तसेच तक्रारदार महिलेच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या परस्पर विकल्या असून एक कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, 1949 मध्ये पुण्यात आलेल्या जगन्नाथ शेट्टी यांनी पुण्यातील प्रसिद्ध रुपाली, वैशाली आणि आम्रपाली या हॉटेसची स्थापना 1951 मध्ये केली होती. या हॉटेलला पुणे महानगरपालिकेकडून (PMC) सर्वात स्वच्छ स्वयंपाकघर पुरस्कार मिळाला आणि पुण्यातील त्रिदल या सांस्कृतिक संस्थेने हॉटेलचे संस्थापक जगन्नाथ शेट्टी यांना "पुण्यभूषण पुरस्कार" प्रदान केला होता. दक्षिण भारतीय पदार्थांच्या गुणवत्तेमुळे हे हॉटेलचे नाव घरोघरी पोहोचले होते आणि ते लोकप्रिय रेस्टॉरंट बनले. बर्याच लोकांसाठी, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वैशाली रेस्टॉरंट हे 1949 पासून केवळ एक प्रतिष्ठित उडुपी हॉटेल नाही तर अद्वितीय पुणेरी स्पिरिटचे ठिकाण आहे. नियमित येणाऱ्यांसाठी, वैशाली हॉटेलने दिलेली चव कायम राहिली आहे. वैशालीचा फॅन क्लब फक्त जवळपासच्या रहिवाशांसाठी मर्यादित नाही तर त्यात शरद पवार, राज ठाकरे आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांचा समावेश आहे.