सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : रविवारपासून बेपत्ता असणाऱ्या पुण्यातील (Pune News) एका तरुणाचा खंबाटकी बोगदाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. ध्रुव स्वप्निल सोनवणे (वय 18) असे या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील बावधान परिसरातील रहिवासी होता. रविवारपासून तो घरातून निघून गेला होता. खंबाटकी बोगदानंतरच्या वळणावरील नाल्यात त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंबाटकी बोगदा परिसरातील रस्त्यालगतची झुडपे काढत असताना एक दुचाकी दिसून आली होती. त्यानंतर आणखी शोध घेतला असता ध्रुव सोनावणे याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. दुचाकीसह तो नाल्यामध्ये पडला होता. मात्र झाडी आणि गवतामुळे तो कोणालाही दिसला नव्हता. गवत साफ करत असताना ध्रुवचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् तपास सुरु केला. अपघातात ध्रुव याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.


ध्रुव हा पुण्यातील बावधन परिसरात राहण्यासाठी होता. ध्रुवचे आई-वडिल  आणि आजी हे सणसुदीसाठी अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले होते. त्यामुळे ध्रुव घरी एकटाच होता. त्यानंतर ध्रुवच्या आत्याने घरी चौकशी केली असता ध्रुव घरी नसल्याचे समजलं. त्यानंतर आत्याने सीसीटीव्ही चेक केलं असता तो रात्री एकच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्याचं दिसून आलं. रविवारपासून ध्रुव बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही देण्यात आली होती. पोलिसांनी ध्रुवचा शोध सुरु केला होता.


पोलिसांनी तपासले लोकेशन


पोलिसांनी ध्रुवच्या मोबाईल लोकेशनद्वारे त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. रविवारी दिवसभर त्याचे लोकेशन पारगाव खंडाळा इथे होते. त्यानंतर त्याचं लोकेशन वाई परिसरात दिसत होतं. मात्र रविवारपासून त्याचे लोकेशन पोलिसांना सापडत नव्हते. ध्रुव आणि त्याचे कुटुंबिय पाच दिवसांपासून त्याचा शोध घेत होता. अखेर खंडाळ्याजवळील खंबाटकी घाटाजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे. ध्रुवच्या मृत्यूने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.