Pune Crime : जेवायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही... इंजिनियची हत्या, धक्कादायक कारण समोर
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी इंजिनिअर तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे (Pune Crime) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे कोयता गॅंग (Koyta Gang) दहशत माजवत असताना दुसरीकडे टोळी युद्धाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना घडवल्या जात आहेत. पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करुनही वारंवार गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडत आहेत. पुण्यात एका संगणक अभियंत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
नगर रस्त्यावरील वाघोलीतील संगणक अभियंत्याच्या खूनाप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका मोटारचालकाला अटक केली आहे. केवळ तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा शस्त्राने गळा चिरून खून केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. गौरव सुरेश उदासी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भगवान केंद्रे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी दुपारी लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. तरुणाच्या मृतदेहाशेजारीच एका दुचाकीदेखील पडल्याचे समोर आले होते. पोलिसांनी बाईकच्या नंबरवरुन शोध घेतला असता ती गौरव उदासी याची असल्याची समोर आले. गौरव उदासी खराडी येथील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरी करत होता.
जेवायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही
गौरव खराडी परिसरातील एका सोसायटीमध्येच मित्रांसमवेत राहत होता. शुक्रवारी रात्री गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून घराबाहेर बाहेर पडला. मात्र, रात्री उशीरापर्यंत गौरव घरी परतलाच नाही. शनिवारी दुपारी त्याचा खून झाल्याची माहिती त्याच्या मित्रांना समजली. याप्रकारानंतर त्यांना धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला.
हत्येचे कारण आले समोर
आरोपी भगवान केंद्रे हा पुण्यात ॲप आधारित कार चालवत होता. गौरवने ॲपवरुन भगवान केंद्रेकडे कार बुक केली होती. यातूनच भगवान आणि गौरवची चांगली ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबरही घेतले होते. अशातच त्यांच्यात पैशाचा देखील व्यवहार झाला. भगवानचे तीन हजार रुपये गौरवने घेतले होते. गौरव वेळेवर पैसे देत नसल्याने भगवान त्याच्यावर चिडला होता. याच रागातून त्याने गौरवला फोन करुन बोलवून घेतले. भगवान त्याच्या साथीदारासह वाघोलीतील डोंगराच्या पायथ्याशी आला. पैशांवरुन त्यांच्यात जोरदार वाद झाला. रागाच्या भरात भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला. त्यानंतर दोघांनीही तिथून पळ काढला. यानंतर तपासामध्ये भगवान आणि त्याच्या साथीदारानेच खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी भगवानला कळंब तालुक्यातील परतापूर येथून अटक केली आहे