स्वतःच्या फायद्यासाठी वापरला कर्मचाऱ्यांचा लाखोंचा पीएफ; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवलेंविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी लाटल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे (Sinhgad Institute) संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसात मारुती नवले यांच्यावर फसवणुकीसह भविष्य निर्वाह निधीमध्ये (Employees' Provident Fund) घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर पुणे पोलीस (Pune Police) मारुती नवले यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान मारुत नवले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
मारुती नवले यांच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमध्ये 2019 ते 2022 पर्यंत ही फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राहुल एकनाथ कोकाटे (वय 51, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कोकाटे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी आहेत. मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार नवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती निवृत्ती नवले हे सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक आहेत. या शाळेमधील साधारण दीडशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीमध्ये लाखोंची कपात करण्यात आली होती. नवले यांनी जवळपास 74 लाख 68 हजार 636 रुपयांची एकूण कपात केली होती. कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त तीन लाख 75 हजार 774 रुपयांचाच रक्कम भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आला होता. ही कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी कोकाटे यांनी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारुती नवले याच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.