सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्याचे तरुण ऑनलाइन होणाऱ्या ओळखींवर जास्त विश्वास ठेवतात. यामुळे त्यांना आयुष्यात मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन अ‍ॅपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. या तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्याकडे असलेली सर्व रक्कम काढून घेण्यात आली. कसा घडला हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील पीडित तरुणाने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. हा तरुण 21 वर्षांचा असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुण तळेगाव दाभाडे येथील एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एका ॲपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. 


तसेच त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बोलावले. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ तरुणाला मोटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आरोपींनी त्याला मोटारीतून भोसरी एमआयडीसी परिसरात नेले. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय परिसरातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर भोसरी परिसरात तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याशी तिघांनी अनैसर्गिक कृत्य केले.  


भोसरी एमआयडीसी परिसरात निर्जन जागी आरोपींनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणााला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील 28 हजार 500 रुपये काढून घेतले. त्यानंतर तरुणाला सोडून तिघेजण मोटारीतून पसार झाल्याची घटना घडली.


पुण्यातील ड्रग रॅकेटचा सूत्रधार पसार 


पुण्यातील ड्रग रॅकेटचा सूत्रधार असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेलाय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री आठच्या सुमारास फरार झाला.ललित पाटील हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार आहे. येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर सूसनमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. त्याचाही सूत्रधार ललितच होता. याचा तपास सुरू असतानाच तो पोलिसांच्या तावडीतून फरार झालाय. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय.


तसंच ससून रुग्णालयातून ललित रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यामुळे प्रकरण आपल्यावर येऊ नये यासाठी ललित पाटीलला ससूनमधील अधिकाऱ्यांची साथ होती का...? असा सवाल उपस्थित केला जातोय.