Pune Crime News : तिने दारु मागितली म्हणून रागाच्या भरात...; पुण्यातल्या घटनेने खळबळ
Pune Crime : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. मात्र गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Pune Crime News : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune News) गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पुणे शहर यासह इतर परिसरातही मोठ्या प्रमाणात संघटीत टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांकडून दहशत निर्माण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही (Juvenile accused) मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा पुण्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे.
डोक्यात दगड घालून खून
कोंढवा (kondhwa) भागातील मेफेअर एलिगंझा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. यानंतर आता या निर्घृण खूनाचा उलघडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली असून आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
हत्येनंतरही त्याच ठिकाणी दारु प्यायला बसले
खून झालेल्या महिलेने दारू मागितल्याने आरोपींनी तिच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जैद आसिफ शेख याला अटक केली आहे. मात्र अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही. या हत्येनंतरही हे दोन्ही आरोपी हत्या केलेल्या ठिकाणी दारु प्यायला बसले होते. याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट पाच आणि कोंढवा पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
महिलेने दारु मागितली आणि...
1 जानेवारी रोजी दोन्ही आरोपी या सोसाटीच्या जवळ दारु प्यायला बसले होते. त्याचवेळी तिथे ही महिला आली. महिलेने दोघांकडे दारु मागितली. मात्र त्यानंतर तिने आरोपींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी रागाच्या भरात जैद आणि त्याच्या साथीदाराने महिलेच्या डोक्यात दगड घातला. यातच महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, रंजन शर्मा, सहायक आयुक्त विक्रांत देशमुख, पौर्णिमा तावरे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे.