सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दोन दिवसांपूर्वी जेजुरीतील (jejuri) राष्ट्रवादीचे (NCP) माजी नगरसेवक मेहबुब सय्यदलाल पानसरे (Mahebub Pansare) यांची कोयता आणि कुऱ्हाडीचे वार करुन हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण जेजुरीसह पुण्यात खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेहबुब पानसरे यांचा निर्घुन खून करणाऱ्या दोन मुख्य आरोपीना अटक केल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनीस प्रल्हाद परदेशी आणि महादेव विठ्ठल गुरव ऊर्फ काका परदेशी (65) राहणार ढालेवाडी, बेंद वस्ती अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी हे मुळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे व पुणे शहर परिसरातील खून, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करुन प्रतिबंध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


त्या अनुषंगाने पुणे शहर परिसरात गुन्हे शाखेतर्फे कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग, नाकाबंदी, सराईत गुन्हेगारांची तपास मोहिमेची कारवाई सुरु करण्यात आली होती. त्याच दरम्यान या आरोपींचा शोध लागला. पोलिसांनी दोघांनाही अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पुणे गुन्हे शाखेने या दोघांना अटक केली आहे.


नेमकं काय घडलं?


जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून मेहबुब पानसरेंवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांनी मौजे धालेवाडी गावाच्या हद्दीमध्ये त्यांनी जमीन घेतली आहे. या जमिनीवरुन आरोपी परदेशी आणि पानसरे यांच्यात वाद होता. शुक्रवारी परदेशी हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करत होते. यावेळी मेहबूबभाई पानसरे हे तिथे गेले होते. पानसरे यांनी कायदेशीर वाद मिटल्यावर जे करायचे ते करा, असे  सांगितले आणि नांगरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी व इतर पाच जणांनी मेहबुब पानसरे व इतर दोघांवर कोयता, कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पानसरेंच्या मानेला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.