Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँग संपवण्याचा बांधला चंग
Pune Crime News : कोयता गँगविरोधात पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात भर रस्त्यांमध्ये कोयता गँगद्वारे दहशत माजवली जात होती. आता गुन्हे शाखेने पहिल्याच कारवाईत मोठं यश मिळवलं आहे
Pune Koyta Gang : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत वाढताना दिसत आहे. अशातच पुण्यात होणारी जी - 20 आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कोम्बिंग ऑपरेशन करण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी धाड टाकत कोयता गँगविरोधात मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत गुन्हे शाखेला मोठं यश आले आहे. डायस प्लॉट येथील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 9 कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने गंभीर गुन्ह्यातील फरारी, तडीपार तसेच मोक्का मधील फरार आरोपी, कोयता गॅंगद्वारे दहशत माजवणारे यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना स्वारगेट पोस्ट येथीले गुन्हेगार अक्षय अप्पया कांबळे अटक करण्यात आली. यावेळी अक्षय कांबळे यांच्याकडून 9 कोयते जप्त करण्यात आले आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या कोयता गँगचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कोयता गँगची दहशत रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली होती.
कोयता गँगकडून गाड्या जाळणे, गाड्यांची तोडफोड करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. यासोबत विना पैसे देता जेवण, कपडे किंवा अन्ये गोष्टी मिळवण्यासाठी कोयत्याची दहशत दाखवली जात आहे. यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे दहशत माजवणाऱ्या एका आरोपीला दोन पोलिसांनी चांगलाच चोप दिला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या सराइत गुन्हेगारांना चोप देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सत्कार देखील केला होता. पोलीस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.