Death Threat To Swati Mohol : पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Murder Case) याच्या हत्येला एक महिला पूर्ण होत असतानाच आता कोथरूडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या भागात त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अशातचा आता पुणे पोलिसांनी खळबळजनक माहिती दिली आहे. सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने बनावट अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat To Swati Mohol) देण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला एक महिला पूर्ण झाला आहे. मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि दोन साथीदारांनी भरदिवसा गोळ्या घालत पुण्यात एकच खळबळ उडवली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशातच आता स्वाती मोहोळ यांना मुन्ना पोळेकरच्या नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून धमकी देण्यात आल्याचा आरोप स्वाती मोहोळ यांनी केला आहे.


स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात दिली होती. त्यानंतर आता पुन्हा स्वाती मोहोळ यांना धमकी मिळत असल्याने पोलिसांनी देखील कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.


काय म्हणाल्या होत्या स्वाती मोहोळ?


माझा नवरा हिंदुत्ववादी होता, हिंदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्यांना जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळं मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार, असं स्वाती मोहोळ यांनी शरद मोहोळच्या हत्येनंतर म्हटलं होतं.


दरम्यान, मोहोळ खुन प्रकरणात गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झालंय.