सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune News) जुन्नर तालुक्यामधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अ‍ॅम्ब्युलन्समुळे (ambulance) एका वृद्धाचा जीव गेल्याचा प्रकार जुन्नरमध्ये घडलाय. रुग्णवाहिकेखाली चिरडले गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील (Junnar) ओतूर येथील बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर रुग्णवाहिका पाठीमागे घेत असताना हा अपघात घडलाय. रुग्णवाहिका मागे घेत असताना चालकाचे लक्ष्य गेले नाही आणि ती वृद्ध व्यक्ती गाडीखाली चिरडली गेली. अ‍ॅम्ब्युलन्सने चिरड्यानंतर जखमी वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रज्जाक मुंढे असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ओतूर येथील बसस्थानकात हा रज्जाक मुंढे उभे होते. त्याचवेळी रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर पडत असताना रुग्णवाहिका चालकाने रज्जाक मुंढे यांना अक्षरक्षः दोन वेळा चिरडलं.


अपघातानंतर त्याच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी रज्जाक मुंढे यांना रुग्णालयात नेलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्ती रुग्णवाहिका चालकाला दिसली नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रुग्णवाहिका चालकाने गाडी मागे घेताना कुठलीही काळजी घेतली नसल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. मात्र चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.



रुग्णवाहिका ही नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी असते. मात्र एका रुग्णवाहिकेमुळे वृद्ध नागरिकाचा जीव गेला आहे. याप्रकरणी रुग्ण वाहिका चालकावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.