सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांची सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. एकीकडे दिवसाढवळ्या गुन्हेगारी टोळक्यांकडून पुणे (Pune Crime) शहर आणि आसपासच्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे कोयता गॅंगकडून हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाड्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून रिक्षा चालकाने प्रवाशाच्या कानाचा लचका तोडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर रिक्षा चालकाने तिथून पळ काढला असून पोलीस (Pune Police) त्याचा शोध घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षा भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात एका प्रवाशाला रिक्षाचालकाने लाथाबुक्यांनी मारहाण केल्यानंतर दाताने चावा घेऊन त्यांच्या कानाचा लचकाच तोडला. संतोष चव्हाण असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.याप्रकरणी, रिक्षाचलकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकाजवळील सातारा रोडच्याजवळील रिक्षा थांब्याजवळ घडली.


याबाबत संतोष चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतात. ते त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी एका रिक्षाचलाकासोबत त्यांचा भाड्याच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी तेथील काही रिक्षाचालकांनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यादरम्यान वाद झालेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेऊन लचका तोडला.


त्यानंतर संतोष चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार रिक्षाचलाकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कारके करत आहेत.


पुण्यात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड


पुण्यातील वडारवाडी येथील बसवेश्वर माथाजवळील बॉलर चौकात शुक्रवारी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला होता.  लाकडी दांडके व लोखंडी हत्यारांनी या टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वीच्या वादातून झालेल्या तोडफोडीप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 10:30 वाजता ही घटना उघडकीस आलेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. टोळक्यांचा एक गट आपली  शस्त्रे घेऊन घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांवर अंदाधुंद हल्ला केला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोडफोडीमुळे फिर्यादीच्या गाडीचेही नुकसान झाले आहे