अरुण मेहेत्रे, सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भररस्त्यात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाईमुळे पुणेकर हैराण असताना आता दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जखमी मोहोळवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आलाय. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यासह इतर सात जणांची काही महिन्यांपूर्वीच पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला होता. मोहोळ याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर पौड पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल होता. 2011 मध्ये पौड इथल्या एका व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात मोहोळवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोणतेही साक्षीदार साक्ष देण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे मोहोळ आणि त्याच्या साथीदारासंदर्भात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.