सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या कृत्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पतीनं असं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन सखोल तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसराती ही धक्कादायक घटना घडली. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. त्यानंतर उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. त्यानंतर दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. काही कळायच्या आता सोमनाथने पत्नी सुवर्णाच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. 


दरम्यान, सकाळी 11 वाजल्यापासून घरी गेलेले आई बाबा परत आले नाहीत म्हणून मुली आणि पुतण्याने त्यांचा शोध सुरु केला. संध्याकाळच्या सुमारास त्यांना त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात सापडली. त्या परिसरात आणखी शोध घेतला असता मुलीला सुवर्णा वाघ यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर वडिलांचा मृतदेह झाडाला गळफास लावल्याचे आढळल्याने त्यांना जबर धक्का बसला. याची माहिती तात्काळ पोलिसांनी कळवण्यात आली. उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी दिली.


जेवताना पत्नीने केले पतीवर वार


पुण्यात घरगुती भांडणातून पत्नीने थेट पतीवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केले. भवानी पेठ परिसरात ही घडली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पती रमेश बबन ससाणे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.