पुण्यात पोलीस- कोयता टोळीत झटापट, जीव धोक्यात घालून पोलिसाने चौघांना पकडलं
पुण्यातल्या सदाशीव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला दोन तरुणांनी पकडून दिलं होतं. ही घटना ताजी असतानाच एका पोलीस शिपायाने जीवा धोक्यात घालून दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगच्या चार जणांना अटक केली.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून (One Side Love) तरुणाने हल्ला केला. यावेळी दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करत त्या हल्लेखोराला पकडलं आणि सुदैवाने त्या तरुणीचा जीव वाचला. या दोन तरुणांच्या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना ताजी असतानाच पुण्यात कोयता गँग (Koyta Gang) आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका पोलीस शिपायाने (Police Constable) जीव धोक्यात घालून कोयत्या गँगमधल्या चार आरोपींनी पकडलं. विजयकुमार ढाकणे असं या पोलीस शिपायाचं नाव असून पुण्यातील मांजरी आणि शेवाळवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
काय आहे नेमकी घटना
पुण्यातील शेवाळवाडीत पोलीस आणि कोयता टोळीत थरार पाहायला मिळाला. कोयता गँगने या परिसरातील पाच दुकानांची कोयत्याने तोडफोड केली. यावेळी तिथे पोहोचलेल्या पोलिसांबरोबर त्यांची झटापट झाली. पण जीवाची पर्वा न करता पोलीस शिपाई विजयकुमार ढाकणए आणि पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी कोयत्या गँगमधल्या चार जणांना पकडलं. यातील दोन मुलं अल्पवयीनअसून त्यांच्याविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात सहजरित्या कोयते उपलब्ध होतायत. एकाच आठवड्यात कोयता हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुलांचा यात जस्ता समावेश असल्याचं दिसून आलं आहे.
पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ
पुण्यात गेल्या काही महिन्यात कोयता गँगकडून गाड्या जाळणे, गाड्यांची तोडफोड करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय विना पैसे देता जेवण, कपडे किंवा इतर गोष्टी मिळवण्यासाठी कोयत्याची दहशत दाखवली जात आहे. यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. हडपसर, सिंहगड रोड, वारजे, विश्रामबाग परिसरात कोयता गँगची दहशत पसरली आहे. हातात कोयते घेऊन दुकानांमध्ये तोडफोड करायची. रात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करायची, असे प्रकार सर्रास घडताना दिसतायत. या गँगनं केलेल्या तोडफोडीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
यानंतरही दहशत कमी नाही
याआधी पुणे शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली होती. या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी बक्षिसांची खैरात सुरू केली. जो कर्मचारी कोयता गँगच्या आरोपीला पकडून आणेल त्याला बक्षीस (Reward) म्हणून रोख रक्कम देण्याची घोषणा पुणे पोलिसांनी केली . पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्यांना 10 हजार तसेच फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचं बक्षीस. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. तर कोयता बाळगणार्याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस देण्याची योजना होती.
पण पोलिसांनी मुसक्या आवळल्या तरी पुण्यात कोयता गँगची दहशत काही कमी होताना दिसत नाहीये. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणं आता क्राईम कॅपिटल बनायला सुरूवात झालीय का, पुण्याचा बिहार होतोय का असे सवाल उपस्थित होतायत..