सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सराईत गुन्हेगारांसह कोयता गॅंगची (Koyta Gang) दहशतही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शुल्लक कारणांवरुन हाणामारीच्या गंभीर घटना पुण्यात घडताना दिसत आहेत. अशातच नशा करण्यावरुन हटकल्याने एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुण्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर व गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला हटकल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. घराजवळ नशा करणाऱ्यांना हटकल्याचा राग टोळक्याला होता. याच रागातून टोळक्याने एका नागरिकावर कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुंडवा परिसरामध्ये उघडकीस आला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता केशवनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती.


नेमकं काय घडलं?


रवींद्र दिगंबर गायकवाड (59, रा. केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गायकवाड यांचा गाई - म्हशींचा गोठा आहे. रविवारी गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करत बसले होते. त्यावेळी गायकवाड यांनी या टोळक्याला या ठिकाणी नशापाणी का करता? अशी विचारणा केली. याचा राग आल्याने टोळक्याने गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण केली.


वाद झाल्यानंतर ते टोळके तिथून निघून गेले. काही वेळाने पुन्हा आरोपी तरुण हातामध्ये कोयते घेऊन घटनास्थळी झाले. त्यांनी पुन्हा गायकवाड यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर दहशत निर्माण करत आरोपी तेथून निघून गेले. यामध्ये रवींद्र गायकवाड हे गंभीर जखमी झाले. जखमी गायकवाड यांना नातेवाईकांनी उपचारांसाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांदरम्यान, गायकवाड यांचा मृत्यू झाला.


दरम्यान, खुनसारख्या गंभीर घटनेनंतरही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न झाला नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. केशवनगर, मुंढवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना पेव फुटले आहे. तरीही पोलिसांकडून हे धंदे थांबवण्याचे प्रयत्न होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबरोबरच टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी, रहिवासी क्षेत्रातच सर्रासपणे नशा, मद्यपान केले जात आहे. त्याचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणत त्रास होत असूनही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.