Pune News in Marathi: पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कोथरुडमध्ये अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्यानंतर शरद मोहोळला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोथरुड भागात दहशत असलेला शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. बाईकवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ तातडीने वनाज इथल्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले होते.


काही महिन्यांपूर्वीच झाली होती सुटका


शरद मोहोळ यांच्यासह इतर सात जणांची जून महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला होता. मोहोळ याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर पौड पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल होता. 2011 मध्ये पौड इथल्या एका व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात मोहोळवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोणतेही साक्षीदार साक्ष देण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे मोहोळ आणि त्याच्या साथीदारासंदर्भात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. 


यासोबत जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, कर्नाटक मधील चेन्नास्वामी स्टेडियम येथील बॉम्बस्फोट, दिल्ली येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील कुख्यात दहशतवादी कातील सिद्धकी याच्या खुनाच्या गुन्ह्यातूनही दोन वर्षांपूर्वी शरद मोहोळची निर्दोष मुक्तता झाली होती. येरवडा कारागृहातीलअतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये कातिल सिद्दिकी याची बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही शरद मोहोळचे नाव आलं होतं. 


पत्नीचा भाजप प्रवेश


दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते. स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती.