सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : पुण्यातील (Pune Crime) पर्वती पोलिसांनी चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न उघडकीस आणत सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या या टोळीत पाच जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून शहरातील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी (Pune Police) तब्बल सात लाखांचा ऐवज देखील जप्त केला आहे. रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोरण्यात ही टोळी प्रसिद्ध होती. ही टोळी पुण्यासह जळगाव, अमरावती तसेच अकोला शहरात देखील चोऱ्या करत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय 25, रा. कात्रज), लोकेश मुकुंदा महाजन (वय 24), प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (वय 25), संदीप अरविंद पाटील (वय 28), दिपक रमेश शिरसाठ (वय 25, रा. सर्व. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने शहरात सोन साखळी चोरी करत पुन्हा उच्छाद घातला आहे. तीन दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन येथील ई-लर्निंग चौकात रात्री साडे नऊच्या सुमारास एका रिक्षा प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावण्यात आली होती. याप्रकरणी पर्वती पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. 


वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक चोरट्यांचा माग काढत होते. यादरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. एकाठिकाणी सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे कैद झाले होते. त्यांची माहिती काढता काढता त्यांच्या गाडीबाबत अधिक माहिती मिळाली. चोरटे संगमब्रिज येथून जळगाव येथे ट्रॉव्हल्सने जाणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लागलीच या माहितीची खातरजमा केली. त्यानुसार या पथकाने दोघांना सापळा रचून अखेर पकडलं. दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. इतर तीन साथीदारांची नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी जळगावमधून प्रसाद, संदीप व दिपक यांना अटक केली आहे.


पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून शहरातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीने पर्वती, भारती विद्यापीठ, सहकारनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या परिसरात चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, चोरीसाठी वापरलेल्या दोन दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.


चोरीचा जळगाव पॅटर्न


पुण्यात चोरी करणारे दोघे व त्यांचे साथीदार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जळगाव, अकोला व अमरावती या शहरात देखील चोऱ्या केल्याप्रकरणी 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात येऊन चोऱ्या सुरू केल्याचे समोर आले आहे.


पुण्यात रात्री 8 ते 11 दरम्यान करायचे चोऱ्या


आकाश व लोकेश दुचाकी घेऊन पुण्यात आले होते. ते पुण्यात भाड्याने खोली घेऊन राहत होते. दोघेही दिवसभर खोलीवर थांबत असत. त्यानंतर रात्री साडे सातच्या सुमारास घराबाहेर पडत. 8 ते 11 वेळेत ते एकट्या महिलांना टार्गेट करत आणि त्यांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावत असे.


राखी पौर्णिमेला पोलिसांची अनोखी भेट


राखी पौर्णिमेच्या दिवशी दागिने हिसकावणाऱ्या पाच चोरट्यांना पर्वती पोलिसांनी पकडून राखी पौर्णिमेचे अनोखी भेट महिला वर्गाला दिली आहे. तीन दिवसांपूर्वी चैन स्नॅचिंग झालेल्या महिलेने चोरीनंतर दागिने परत मिळतील याची अपेक्षा सोडली होती. पण, तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी चोरट्याला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलांनी पोलिसांचे कौतुक केलेच पण, आनंद आश्रूही त्यांच्या डोळ्यात तरळले.