सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड (bharat gaikwad) यांनी पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नोती मिळाली होती. सोमवारी पहाटे त्यांनी आपल्या आधी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले. दोघांची हत्या केल्यानंतर गायकवाड यांनी स्वतःवरही गोळी झाडली आहे. पोलिसांनी या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.


नेमकं काय घडलं?


भारत गायकवाड यांना नुकतीच वरिष्ठ पोलीस निरक्षकपदावरुन सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली होती. भारत गायकवाड अमरावती येथे कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यात राहत होते. गायकवाड हे अमरावतीवरुन सुट्टी घेऊन पुण्यात आले होते. सोमवारी पहाटे त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या दीपक तिथे धावत आला. त्यानंतर गायकवाड यांनी त्यालाही गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.


भारत गायकवाड यांनी पत्नी मोना गायकवाडवर गोळी झाडण्यापूर्वी त्यांची आई आणि मुलगा सुहास यांना खोलीतून बाहेर काढले होते. पण गोळीबाराचा आवाज ऐकून आलेल्या पुतण्याला त्यांनी संपवले. या घटनेची माहिती सुहासने पोलिसांना दिली. त्यानंतर तिघांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पंचनामा केला. भारत गायकवाड यांनी गोळ्या लायसन्स रिव्हॉल्वरमधून झाडल्या की त्यासाठी दुसरी पिस्तुल वापरली, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे, अशी  माहिती पोलिसांनी दिली.


पोलिसांनी काय सांगितले?


"पहाटे साडेतीनच्या सुमारास भारत गायकवाड यांनी  गोळीबार केला असून त्यांनी स्वतःवरही गोळी झाडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिासांच्या पथकाने घटनास्थळी भेट देली. मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड यांनी त्यांच्या पत्नीला स्वतःच्या रिव्हॉलव्हरमधून गोळी घातली. त्यांना अडवण्याचा प्रयत्न पुतण्या आणि मुलाने केला. या प्रयत्नामध्ये पुतण्याला पण गोळी लागली. त्यानंतर भारत गायकवाड यांनी मुलाला बाहेर काढून स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही," अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.