Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारांची दहशत कमी होताना दिसत नाहीये. पुण्यात एका धक्कादायक घटनेत, दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील विंडशील्डची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाघोली येथील बकोरी रोडवर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात स्कूल व्हॅनचा चालक जखमी झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटलं जात असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 9.30 च्या सुमारास वाघोली येथील बकोरी रोडवर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅन चालक सचिन इंगवले (वय 27) हा काही विद्यार्थिनींना त्यांच्या राहत्या घरी सोडण्यासाठी जात असताना दोन अल्पवयीन तरुणांनी त्यांची व्हॅन अडवून इंगवले यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दोघांनीही कोयत्याने व्हॅनच्या खिडकीची तोडफोड केली आणि इंगवले यांना जीवे मारण्याची धमकी दिली. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


वाघोली इथल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या आठ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनवर हा हल्ला झाला. आरोपींनी रस्त्याच्या मध्यभागी ही स्कूल व्हॅन अडवली होती.  सचिन इंगवले यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी व्हॅनच्या विंडशील्ड आणि बाजूच्या खिडकीची काच फोडली. यामध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी ते प्रचंड घाबरले होते आणि मदतीसाठी ओरडत होते. या हल्ल्यात तुटलेल्या काचांमुळे इंगोले यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर इंगवले यांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.


कशामुळे झाला हल्ला?


हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचे इंगवलेंसोबत जुना वाद होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले आहे. अटकेत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या बहिणीने केलेल्या छळाच्या तक्रारीनंतर इंगवले एका संशयितासोबत कोर्टात गेले होते. इंगवले त्या संशयितासोबत गेल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारासह हल्ला करण्याचे ठरवले होते.