सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) कायद्याचे रक्षकच महिल्यांच्या सुरक्षेचे भक्षक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात ओळख वाढून जेवणासाठी घरी येत असताना गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचार्‍यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलीस शिपायाने त्याच्या क्रूरकृत्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर सातत्याने बलात्कार केला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी खडक पोलिसांनी दीपक सिताराम मोघे या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. मोघे हा सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणुकीवर आहे. दीपक सिताराम मोघे विरोधात एका महिला पोलीस कर्मचार्‍याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर 2020 ते 1 ऑगस्ट 2023 दरम्यान घडल्याचे समोर आलं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शहर पोलीस दलात नेमणुकीला आहेत. दोघेही स्वारगेट पोलीस वसाहतीत राहतात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली होती. या काळात मोघे पीडित महिलेच्या घरी जेवणासाठी जात होता. त्याच दरम्यान मोघेने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीचे औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे  पीडितेला आणखी गुंगी येऊ लागली आणि ती झोपी गेली.


याच संधीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध केले. आरोपीने त्याचा व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर आरोपीने हा सगळा प्रकार पीडितेला दाखवला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी फिर्यादीच्या घरातील कपाटातील 5 ते 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. खडक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक तोटेवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.