सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime News) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे काही प्रमाणात टोळीयुद्ध सुरु असताना मध्यंतरी कोयता गॅंगने (koyta gang) दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात कोयता गॅंगची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही कोयता गॅंग डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे वैयक्तित कारणातून होणाऱ्या गुन्ह्यांचेही प्रमाणवही वाढताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार खडकी भागात पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या खडकी बाजार परिसरात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 46 वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनैतिक संबंधातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे म्हटले जात असून खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत महिला ही 46 वर्ष वयाची आहे. खडकी बाजार परिसरातच ती काम करते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसून आली होती. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


माय-लेकीचा गळा आवळून खून


दरम्यान, सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुणीकोनूर या ठिकाणी माय लेकीची हत्या करण्यात आली आहे. प्रियंका बेंळूखी आणि मोहिनी बेंळूखी असे माय लेकीचे नाव असल्याचे समोर आले आहे. हे घटनेचे नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार करत आहेत. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही माय-लेकीचा कापडाने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून पती बिरापा बेंळूखी याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही.