पुण्यात चाललंय काय? हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता तरुणीकडून लग्नासाठी तरुणाचं अपहरण
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना काल पुण्यात घडली होती. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात तर
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित होतोय. अधिकाऱ्यांचं पुणे गुन्हेगारांचं पुणे बनत चालल्याची चर्चा सुरु झाली आहे. मंगळवारी भरदिवसा एका तरुणीनेवर हल्लेखोराने कोयत्याने (Koyta) वार केले. एमपीएससीची विद्यार्थिनी असलेल्या या मुलीवर शंतनू जाधव (Shantanu Jadhav) या तिच्या ओळखिच्याच मित्राने हल्ला केला. यात हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
तरुणीने तरुणाचं केलं अपहरण
लग्न करायला नकार दिल्यानं एका तरुणीने चक्क तरुणाचं अपहरण (Kidnapping) केलंय. सोलापूरच्या 23 वर्षाच्या तरुणाचे 28 वर्षाच्या विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं आणि त्याला सोलापूरला बोलावून घेतलं. त्याचाच राग आल्यानं महिलेनं दोन जणांना सुपारी देत कोडवे धावडे परिसरातून त्याचं अपहरण केलं. पोलिसांनी वापीतल्या हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली. याप्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आलीय.
काय आहे नेमकं प्रकरण?
प्रेमसंबंधास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. पण पुण्यात विवाहित तरुणीने लग्नासाठी चक्क तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण करून त्याला गुजरातमधील वापी इथं नेण्यात आलं. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी इथं जाऊन तरुणाची सुटका केली.
गुजरातमधील वापी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत 23 तरुणाचे एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. मात्र तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केल्याने तो पुण्यात परत आला होता. तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला. यासाठी तीने दोन जणांना सुपारी दिली. त्या दोघांनी तरुणाचं पुण्यात अपहरण करुन त्याला गुजरातमधील वापीत आणलं. त्यानंतर तिथेच त्याला डांबून ठेवलं.
आरोपी तरूणाने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय २१, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय २६, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती
तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसून आल होतं. तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली.