सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता शाळकरी मुलांमध्येही गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुण्यात शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात घडली. या हल्ल्यात दहावीच्या वर्गातील मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत 15 वर्षीय मुलाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगा महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेली चारही मुले याच परिसरात महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतात.


तक्रारदार मुलाचा दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे पाहण्यावरून एका मुलाशी वाद झाला होता. त्या मुलाने शाळेतील मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तक्रारदार मुलगा रामोशी गेट परिसरातून घरी जात होता. त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली. तुला मस्ती आली का? असे म्हणत मुलाला साखळी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाच्या छातीवर चाकूने वार केला. त्यावेळी नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना याबाबत कळवले.


दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. जखमी झालेल्या मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.


साकीनाक्यात विद्यार्थ्यावर चाकू हल्ला


मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी सोमवारी पवई हायस्कूलच्या 14 वर्षीय विद्यार्थ्यांविरुद्ध शाळकरी मित्रावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात पीडित मुलाच्या गालाल आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. साकीनाका इथल्या वीर सावरकरनगर येथे राहणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचे  25 जानेवारी रोजी नववीतील विद्यार्थ्यांसोबत भांडण झाले होते. या रागात 28 जानेवारी रोजी दुपारी 1.10 च्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्याने नववीच्या विद्यार्थ्याला इन्स्टाग्रामवर  मेसेज टाकत भेटायला बोलवले. त्याला नववीच्या विद्यार्थ्याने होकार दिला आणि दुपारी तीन वाजता दोन्ही विद्यार्थी मित्रांसह मैदानावर जमल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.