शरद मोहोळ प्रकरणातील बड्या आरोपींना अटक; तिघांची होती महत्त्वाची भूमिका
Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांचाही या हत्येमध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हटलं जात आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे आता शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या 13 वर आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री या तिघांना अटक केली आहे. या तिघांचाही या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गुंड शरद मोहोळ याच्यावर दुपार दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत.
आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वीच कट रचला होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची सर्व व्यवस्था ही नितीन खैरे यानेच केली होती. तर आदित्य गोळे याने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. मोहोळचा खून करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटातही तो सहभागी होता. तर तिसरा आरोपीसुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. तसेच या संपूर्ण कटात देखील तो सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळचे साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही सहभाग आहे. गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
या आरोपींना आतापर्यंत अटक
या खून प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय 20, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय 35, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय 24, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय 20, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय 34, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा), ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उडान, धनंजय मारुती वटकर (वय 25, रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय 28, रा. मुळशी) आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे यांना अटक करण्यात आली आहे.