Vanraj Andekar Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने 24 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून, 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.


बहिणी, मेहुणे अटकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक वाद, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाली. आंदेकर यांची बहीण संजीवनी, मेहुणे प्रकाश, जयंत, गणेश, कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह साथीदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.


त्या हत्येचा बदला


आंदेकर यांचा खून झाल्यानंतर नाना पेठेतील समाधान चौकात राहणारा प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय 33) पसार झाला होता. बेल्हेकरविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासहीत 4 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तो नाना पेठेतील सूरज ठोंबरे टोळीतील सदस्य आहे. ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड मित्र आहेत. वर्षभरापूर्वी झाालेल्या निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आरोपी कोमकर, गायकवाड आणि बेल्हेकर यांनी आंदेकरांचा खून करण्यासाठी कट रचल्याची माहिती तपासात उघड झाली.


डिसेंबरमध्ये बैठक


गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोमकर आणि गायकवाड यांची बैठक झाली. बेल्हेकरने गायकवाड आणि कोमकर यांची बैठक घडवून आणली होती. आरोपी गणेश कोमकर आणि बेल्हेकर सोशल मीडियावरुन संपर्कात असल्यासंदर्भातील तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. हत्येच्या कटात बेल्हेकरने महत्त्वाची भूमिका बजावली, असे पोलिसांनी सांगितले आहे.


आरोपींना जामीन मिळवून देण्याची जबाबदारी


आंदेकर यांचे मेहुणे गणेश याच्यावर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवून देणे, तसेच पैसे उभे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोमकर, बेल्हेकर, गायकवाड, दहिभाते यांनी आंदेकरांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.


3 अल्पवयीन आरोपींपैकी एक सज्ञान


आंदेकर खून प्रकरणात सुरुवातीला तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी एक सज्ञान असल्याचे तपासात समोर आले आहे. तात्यासाहेब गायकवाड (वय 18) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.


प्रसाद बेल्हेकरची महत्त्वाची भूमिका


वनराज आंदेकर खून प्रकरणात प्रसाद बेल्हेकरने महत्त्वाची भूमिका बजावली. तो हत्या प्रकरणातील सूत्रधार आहे. याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असं पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितलं आहे.