भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घटताना समोर येत आहे. आता बाणेर येथील महाबळेश्वर हॉटेल जवळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून तरुणावर बेछूट गोळीबार करण्यात आला. ही घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी त्याच्या उजव्या मांडीत लागली आहे. जखमी झालेला तरुण स्वतःहून कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झाला.
आकाश पोपट बाणेकर असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य दीपक रणावरे, सागर लक्ष्मण बनसोडे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित ननावरे आणि आणि निलेश पिंपळेकर या दोघांमध्ये महाबळेश्वर हॉटेल जवळ वाद झाले होते. रोहितला निलेशमुळे कामावरून काढून टाकल्याचा गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याने निलेशला महाबळेश्वर हॉटेलजवळ भेटायला बोलवले. त्यांच्यात यावेळी वाद झाले. त्यावेळी निलेश याने आकाशला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. त्यावेळी आकाशने रोहित ननवरे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी देखील त्याने वाद घातला.
तिथून निघून गेलेल्या रोहितने मित्रांना गोळा केले आणि तो पुन्हा बाणेरमधील महाबळेश्वर हॉटेल जवळ आला. आदित्य, सागर यानी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. आदित्यने बंदुकीमधून त्यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. यातील एक गोळी त्याच्या उजव्या मांडीत लागली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळालेला आकाश एकटाच लवळे येथील कासारसाईमध्ये असलेल्या एका रुग्णालयात स्वतःहून उपचारांसाठी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास चतुशृंगी पोलीस करीत आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करत तरुणाचा खून
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी कोणाचा प्रकार घडला आहे. किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करीत खून करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ हादगे आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.