Pune Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या (online fraud) वेगवेगळ्या पद्धती सध्या समोर येत आहे. याआधी सायबर गुन्हेगारांकडून (cyber crime) फोनवरुन फसवणूक करत लोकांची लूट केली जात होती. खोट्या माहितीच्या आधारे लोकांना जाळ्यात अडकवले जात होते. मात्र आता लोक स्वतःहून या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर येत आहे. पुण्यात (Pune News) एका व्यक्तीला बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (Help line Number) फोन करणे दोन लाख रुपयांना पडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसे काढण्यासाठी ही व्यक्ती एटीएमध्ये गेली होती. मात्र एटीएममधून पैसे न निघाल्याने त्या व्यक्तीने बँकेत न जाता थेट गुगलचा आधार घेतला. फसवणूक झालेल्या व्यक्तीने गुगलवर बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधून काढला. यानंतर त्या नंबरवर मदतीसाठी फोन केला. मात्र हा फोन क्रमांक होता एका सायबर भामट्याचा.


या सायबर चोरट्याने गुगलवर बँकेच्या हेल्पलाईन नंबरच्या ऐवजी स्वतःचा फोन नंबर दिला होता. फसवणूक झालेल्या व्यक्तीने एटीएममधून पैसे न निघाल्याने या क्रमांकावर फोन केला. सायबर चोरट्याने आपण बँकेतील कर्मचारी बोलत असल्याचे सांगत त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवले. त्यानंतर आरोपीने त्या व्यक्तीला एनीडेक्स हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड करताच आरोपीने त्या व्यक्तीचा मोबाईलचा ताबा घेतला आणि बँक खात्यातून तब्बल दोन लाख रुपये काढले.


फसवणूक झाल्याचे समजताच त्या व्यक्तीने सायबर पोलिसांत धाव घेतली. फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर  विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.