पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्ण युग तरुण मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर  मंदिर साकारण्यात येणार आहे. ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त हा देखावा साकारण्यात येईल. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे.


स्थापत्यकलेचा उत्कष्ट नमुना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल १२०० ते १६०० वर्षांपूर्वी असलेल्या मंदिराच्या स्थापत्यकलेचा उत्कष्ट नमुना भाविकांसमोर आणण्याचा सजावटीच्या माध्यमातून  प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्टयपूर्ण असणार आहे. गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत. हे मंदिर १३ मजली असून ६६ मीटर उंचीचे आहे. वास्तुकला, पाषाण आणि ताम्र शिल्पांकन, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषण या कलांचे भांडार असा लौकिक असलेल्या या मंदिरामध्ये संस्कृत आणि तमीळ पुरालेखांचा अनोखा संगम आहे.



आकर्षक रंगकाम


श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून ९० फूट उंची आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत.