दुर्लक्षित आणि दुर्लबांसाठी पुण्यातील डॉक्टर सोनवणे ठरले आरोग्यदूत
पुणे : समाजातील दुर्लक्षित आणि दुर्बलांसाठी पुण्यातील एक डॉक्टर आरोग्यदूत बनून आलेत. पाहूया या डॉक्टरांचं अनोखं कार्य... रस्ते, स्टेशन्स, बस स्थानकावर फिरणारे भिकारी... देशातल्या विविध भागात हे चित्र हमखास पाहायला मिळतं. या भिकारी, दुर्लक्षित तसंच दुर्बलांना आर्थिक तर कधी खाण्याची मदत आपण करतो आणि आपापल्या कामावर निघून जातो. मात्र, अशाच दुर्लक्षित आणि दुर्बलांसाठी आधारवड ठरले आहेत पुण्यातील एक डॉक्टर...
रस्त्यावरील भिकारी, दुर्बल आणि दुर्लक्षित हे सुद्धा समाजातील एक घटक आहेत. त्यांनाही आधाराची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील डॉ. अविनाश सोनवणे अशा पद्धतीने रस्त्यावरील दुर्लक्षितांची सेवा करतात.
पुण्यातील रस्त्यावरील भिकारी असो किंवा एखादा उपेक्षित त्यांच्यावर डॉ. सोनवणे सकाळी दहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत औषधोपचार करतात. समाजाचे आपण काही तरी देणं लागतो या भावनेनं ते हा उपक्रम राबवतात. तसंच रस्त्यावर भीक मागणाऱ्यांनी भीक मागण्यापासून परावृत्त करणं हा सुद्धा त्यांचा उद्देश असतो.
भिकाऱ्यांवर मोफत औषधोपचार करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉ. सोनावणे त्यांच्यासाठी आरोग्यदूत ठरलेत. डॉ. सोनावणे यांच्या या अनोख्या समाजकार्यातून दुर्लक्षित आणि दुर्बल घटकांमध्ये नवी उमेद निर्माण झालीय.