Pune Drugs Vetal Tekdi Case: "महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण हे सत्ता व पैशांच्या नशेत धुंद झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे राज्यातील तरुण पिढी वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या जालीम नशेने झोकांड्या खात आहे किंवा नशेच्या बेहोशीत रस्त्यावर पडलेली दिसत आहे," असं म्हणत ठाकरे गटाने राज्यात वाढत असलेल्या ड्रग्जसंदर्भातील प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर एका मराठमोळ्या अभिनेत्याने शूट केलेल्या व्हिडीओनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने 'सामना'मधून सरकारला लक्ष्य केलं आहे.


महाराष्ट्रात सध्या नेमके काय सुरू आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे वगैरे माहेरघर म्हणून पुणे प्रख्यात होते. आज तेच पुणे नशेचे माहेरघर बनताना आपण सगळेच फक्त पाहत आहोत. पुण्यातील एक अभिनेते रमेश परदेशी यांनी पुण्यनगरीतील सध्याचे भयावह चित्र समोर आणले आहे. पुण्याच्या वेताळ टेकडीवर दोन कॉलेज तरुणी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने बेहोश अवस्थेत पडल्याचा व्हिडीओ परदेशी यांनी प्रसिद्ध केला. या व्हिडीओने महाराष्ट्रात सध्या नेमके काय सुरू आहे? पुरोगामी तसेच सामाजिकदृष्टया प्रगत महाराष्ट्र कसा ‘नशेडी’ बनलाय व कॉलेज तरुण या नशेद्वारे आत्मघात करीत असताना सत्ताधारी राजकीय नशेने कसे बेफिकीर बनले आहेत, हे दाहक वास्तव समोर आणले आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.


टिळक, गोखल्यांचे पुणेही नशेच्या विळख्यात


"पुण्याचे सांस्कृतिक अधःपतन एवढ्या झपाट्याने होत असताना पुण्याचे पालकमंत्री व त्यांचे राजकीय भालदार-चोपदार कोठे आहेत? की या नशेच्या व्यापारातून त्यांचीही कमाई सुरू झाली आहे? पुण्यात गेल्या आठवडाभरात पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून 3 हजार 500 कोटी रुपये किमतीचे 1 हजार 800 किलो ड्रग्ज जप्त केले. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात पोलिसांनी छापा टाकून 55 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील एका पंपनीत मेफेड्रोनचे उत्पादन होत होते आणि नेपाळमार्गे इतर देशांत ते पाठवण्यात येत होते. त्याच वेळी सांगलीतील कुपवाड येथूनही 300 कोटी रुपयांचे 140 किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. मिठाच्या पुड्यांमधून ‘एमडी’ ड्रग्जची विक्री होत असे व या पुड्या पुण्यातील कॉलेज तरुणांना सहज मिळत आहेत. याआधी नाशिकमध्ये ड्रग्जसंदर्भात मोठी कारवाई झाली, पण नाशिकमधील ड्रग्ज व्यापाराचा सूत्रधार ललित पाटील याचे मोठे जाळे पुण्यात आहे व त्याचमुळे तो ससून इस्पितळातून पळून जाऊ शकला. पुणे, नाशिक, सांगलीसारख्या भागांत हा असा नशेचा विळखा पडला आहे. नाशकातील मोठा तरुण वर्ग नशेच्या अमलाखाली आहे व नाशिक शहरात पान टपऱ्यांवरही नशाबाज पदार्थांची खरेदी होते. त्याविरोधात जागरुक नाशिककरांनी प्रचंड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. पण तरीही नशेचा विळखा ढिला पडल्याचे दिसत नाही. आता टिळक, गोखल्यांचे पुणेही त्याच नशेच्या विळख्यात तडफडताना दिसत आहे. याला जबाबदार कोण?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.


गुंडांवर काय कारवाई केली?


"पुण्यात नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आले. आल्या आल्या त्यांनी पुण्यातील गुंडांची परेड काढून प्रसिद्धीचा झोत स्वतःवर पाडून घेतला, पण त्या गुंडांना राजकीय आश्रय देणाऱ्यांची ‘परेड’ करण्याची हिंमत ते दाखवू शकले नाहीत. पुण्यात गुंडांची परेड काढली हे ठीक, पण त्याच परेडनंतर पुण्यात निखिल वागळे यांच्यावर राजकीय गुंडांनी भ्याड हल्ला केला. भररस्त्यावर त्यांची गाडी पह्डली. त्यांना ठारच करायचे होते, पण वागळे नशिबाने वाचले. वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी हे तिघे पुण्यातील ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी आले, पण गुंडांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या गुंडांवर काय कारवाई केली? या गुंडांच्याही डोक्यात सत्तेची व खंडणीच्या पैशाची नशा भिनली असून पुण्याच्या रस्त्यांवर कसाही धिंगाणा घातला तरी आपले कोण काय वाकडे करणार? ही नशा पुण्याचे पोलीस उतरवणार नसतील तर त्यांच्या परेडचा काडीमात्र उपयोग नाही," असं म्हणत ठाकरे गटाने पुणे पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.


याला दिल्ली-महाराष्ट्राचे राज्यकर्ते जबाबदार


"पुण्यात जागोजागी गुंडांचे अड्डे व ड्रग्ज पुरवठ्याची केंद्रे निर्माण झाली आहेत. तसे नसते तर वेताळ टेकडीवरील बेहोश मुलींचे भयावह चित्र दिसलेच नसते. कायद्याचे राज्य म्हणजे फक्त पोलिसी दंडुके व त्यांच्या हातातील बंदुकांचे राज्य नाही. कायद्याचे राज्य हे नैतिकता व सुसंस्कृत लोकांचे राज्य असते. महाराष्ट्रात नैतिकतेचे अधःपतन सुरू आहे. राजकीय नीतिमत्ता उरलेली नाही. मिळेल त्या मार्गाने पैसे जमा करायचे व त्याच पैशातून सत्ता मिळवायची. हा प्रचंड पैसा नशेच्या व्यापारातून, त्यातील हप्तेबाजीतूनही मिळालेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तोच पैसा आणि सत्तेच्या हव्यासातून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसारखी शहरे नशेच्या अधीन झाली. मुलांना रोजगार नाही. चांगले जगणे नाही. जगण्याला प्रतिष्ठा नाही. परीक्षांत गैरव्यवहार सुरू आहेत. शिक्षणाचा उपयोग नाही. सरकार रोजगार, नोकऱ्यांची फसवी आश्वासने देत आहे. याच निराशेतून राज्यातील तरुण पोरे नशेचा फास स्वतःभोवती आवळून घेत असतील तर त्यास सध्याचे दिल्ली-महाराष्ट्राचे राज्यकर्ते जबाबदार आहेत," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.


पुणे शांत झोपलेले कसे?


"पुण्यातील वेताळ टेकडीवर बेहोश पडलेल्या दोन कॉलेज तरुणी हे भयावह चित्र प्रातिनिधिक आहे. मिठाच्या पुड्या शाळा-कॉलेजांत आणि घराघरात पोहोचल्या आहेत. पालकांना त्याचा थांगपत्ता नाही. त्या दोन नशेबाज तरुणींचे पालक त्यांच्या घरी कदाचित निश्चिंत असतील, पण कालचा व्हिडीओ बघून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली असेल. महाराष्ट्रात जुगार, अमली पदार्थ, खंडणी, खुनाखुनी यांनी कहर केला आहे. वेताळ टेकडीवरील भयपट धक्कादायक आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत जागरूक असलेले पुणे वेताळ टेकडीवरच्या भयपटानंतरही शांत झोपलेले कसे?" असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.