कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पुण्यातल्या बावधनमध्ये एका महिलेच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. या महिलेनं अगोदर सोसायटीतल्या गाड्यांना आपल्या कारनं धडक दिली. त्यानंतर पोलीस घेऊन गेलेल्या शेजाऱ्यांना शिविगाळ करून पळवून लावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या बावघनच्या मार्व्हल वसाहतीत सकाळी सहा वाजता भरधाव गाडी आली आणि या कारनं एकदा नाही तर दोनदा दुसऱ्या कारला धडक दिली. ही कार स्वाती सौरभ मिश्रा ही महिला चालवत असल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या मदतीनं संबधित महिलेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण दारूचा अंमल असलेली ही महिला भरतीच शिरजोर निघाली. तिनं चौकशीसाठी आलेल्या पोलिसांनाच फैलावर घेतलं.


अंगावरचे कपडे काढण्याची धमकी दिल्यानंतर पेट्रोलिंगच्या पोलिसांनी तिथून पोबारा केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


महिलेनं दादागिरी केली पोलिसांना पळवून लावलं तरीही पोलीस कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळं हे प्रकरण हायप्रोफाईल असण्याची शक्यता आहे. या महिलेच्या दादागिरीमुळे मार्व्हल सोसायटीतल्या रहिवाशांमध्य़े दहशतीचं वातावरण आहे.