पुणे : झटपट पैसा कमावण्यासाठी कोण कधी काय करेल, सांगता येत नाय. ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपचा वापर वाढल्यापासून ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. पण पुण्यातील एका पठ्ठ्याने सराफांना असा चुना लावला, त्याचा या सराफांनी बाप जन्मात विचार केला नसेल. या पठ्ठ्याने फेक पेमेंट अ‍ॅपच्या मदतीने तब्बल 25 सराफांना चुना लावलाय. सराफांना चुना लावणाऱ्या या तरुणाला  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. (Pune engineering student cheats jewellers shop with fake online payment app)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की प्रकरण काय?


सराफांना चुना लावणाऱ्या या 22 वर्षीय तरुणाचं नाव निखील जैन. हा पठ्ठ्या इंजीनिअरिगंचा विद्यार्थी. यूट्युबवर विविध व्हीडियो पाहायचा. यात त्याला फेक पेमेंट अ‍ॅपची माहिती मिळाली. इथूनच सुरुवात झाली. हा पठ्ठ्या अनेक सराफांकडून सोने खरेदी करायचा. खरेदी केलेल्या सोन्याची रक्कम ही हा तरुण आरोपी यूट्यूबवर पाहून तयार केलेल्या फेक पेमेंट अ‍ॅपच्याद्वारे द्यायचा. सराफांची खात्री पटावी म्हणून पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेजही दाखवायचा. पण पैसे जमा व्हायचे नाहीत. हे असं या पठ्ठ्याने एका दुकट्या नाही, तर तब्बल 25 सराफांसह केलं.


असं फुटलं बिंग


हा हायटेक पठ्ठ्या पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधील सराफांकडून सोने खरेदी करायचा. ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपच्या माध्यामातून पैसे ट्रान्सफर केल्याचा आव आणायचा. सराफांना शंका येऊ नये म्हणून मेसेज दाखवायचा. पण मेसेज दाखवल्यानंतरही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे एका सराफाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.


सराफाने तडक पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी जंगजंग पछाडलं. या चुना लाव्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 274 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर पोलिसांनी या तरुणाचा छडा लावला आणि ताब्यात घेतलं. 


पोलिसांनी या आरोपी तरुणाकडून 100 ग्रॅम पेक्षा अधिक सोन्याचे आभूषणं, मोबाईल आणि बाईक असा एकूण 5 लाख 77 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.