Pune Family Died Electrocuted: पुण्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथे एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. टॉवेल वाळात घालण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नी आणि मुलालाही विजेचा जोरदार झटका बसल्याने त्यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.


केवळ मुलगी बचावली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या आसपास भालेकर कुटुंबियांच्या घरात ही धक्कादायक घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातुन दौंड तालुक्यातील दापोडी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या भालेराव कुटुंबावर काळाने झडप घातली असून यात सोन्यासारखं कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. सुनील देविदास भालेकर (वय 45 वर्षे), पत्नी आदिका भालेकर (वय 38 वर्षे) व त्यांचा लहान मुलगा परशुराम भालेकर (वय 19 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, केवळ बाहेर गेल्याने मुलगी वैष्णवी या दुर्घटतुन बचावली गेलीय.


नक्की घडलं काय?


सुनील हे त्यांच्या कुटुंबासहीत मागील 5 वर्षांपासून पत्र्याची खोलीत राहत होते. राहत्या घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरल्याने सुनील हे अंघोळसाठी जात असताना कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकत असताना हा अपघात घडला. सुनील यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे पत्नी आणि मुलगा त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना ही विजेचा धक्का बसला आणि या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मयत मुलगा परशुराम हा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावीत शिकत होता. तर मुलगी वैष्णवी हा सारा प्रकार घडला तेव्हा घराबाहेर गेली होती म्हणून या दुर्घटनेतून वाचली गेली. मागील पाच वर्षांपासून हे कुटुंब याठिकाणी उदरनिर्वाह करीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


नक्की वाचा >> पुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा Video


घराच्या भितींमध्ये करंट कसा उतरला? पोलीस अन् महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती


सदर घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण संपागे, महावितरण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. "या घराला एका पाईपमधून टाकलेल्या वायरच्या माध्यमातून वीजपुरवठा होत होता. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पाईप वाकला. त्यामुळे वीजप्रवाह असलेली वायर भालेकर यांच्या रुमच्या संपर्कात आली. त्यामुळेच त्यांच्या घराच्या भिंतींमध्ये करंट उतरला," अशी माहिती देशमुख यांनी दिली. महावितरणचे प्रवक्ते विकास पुरी यांनी या घटनेसंदर्भात बोलताना, 'वायरवरील कोटींग निघालं असल्याने त्यामधून करंट पत्राच्या भिंती असलेल्या या घरात उतरला असणार,' अशी शक्यता व्यक्त केली. या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.