पुणे : पुण्यातील पुराचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुण्याला ५ दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. पंपिंग स्टेशन नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पर्वती पाणीपुरवठा केंद्र जलवाहिन्यांना झालेल्या अडथळ्यांमुळे नवी पेठ ते प्रभात रस्ता परिसरातल्या भागास आज पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबहाद्दूर शास्त्री रस्ता, लोकमान्य कॉलनी, नवी पेठ, अलका सिनेमा चौक, पूना हॉस्पिटल, पाठक बाग, राजेंद्रनगर, वैकुंठ स्मशानभूमी, डेक्कन, पुलाचीवाडी, प्रभात रस्ता या परिसरास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. जलवाहिन्या दुरुस्तीची कामं युद्धपातळीवर तातडीनं हाती घेण्यात आलेलं असून दुरुस्ती कामं झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.


दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.


पुण्यात काल रात्री ढगफुटीसदृष झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. पुण्यात एका रात्रीत पावसाने १० बळी घेतले. सलग २ तासाच्या पावसानं शहर आणि परिसरात अक्षरश: कहर केला. विशेष करून कात्रज, आंबेगाव तसेच सिंहगड रोड परिसरातील ओढे नाले ओव्हरफ्लो होऊन त्यांचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं. अनेक सोसायट्या तसेच झोपडपट्टी भागांत पाणी शिरलं. रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना ओढ्याचं स्वरुप आलं.


पुणे सातारा महामार्गावरील नविन कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. रस्त्यावर पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यानं त्यावर वाहनं न नेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. बिबवेवाडी महेश सोसायटी चौकात नदीला पूर आल्याप्रमाणे पाणी उसळत होतं. शेकडो गाड्या बंद पडल्या. पाण्याचा प्रवाह एवढा होता की गाड्या ढकलल्या जात नव्हत्या.


गल्ली बोळातून आणि अंतर्गत रस्त्यांवरूनही खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. रात्री ८ ते ११ या तीन तासात ११२  मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पर्जन्यमानानं २४ तासाच्या काळात शंभरी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती.