पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेत एक थरारक घटना घडली, येथे 15 वर्षांची एक मुलगी केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली असता, तिचा पाय घसरला आणि ती तोल जाऊन खाली पडली. परंतु नशिबाने ती मुलगी चौथ्या मजल्याच्या एका खिजकीच्या सज्जावर अडकली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या मुलीला सुखरुप खाली उतरवले गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये ही थरारक घटना घडली आहे. येथे इमारतीच्या टॅरेसवरती ही मुलगी केस वाळवण्यासाठी गेले होते तेथे तिचा पाय घसरल्याने तोल जाऊन ही मुलगी खाली पडली. परंतु तिचे नशिब इतक चांगले होते की, ती चौथ्या मजल्याच्या सज्जावर जाऊन अडकली. ही मुलगी काही सेंटिमीटर जागेमधे उभी असल्याने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. त्यानंतर या मुलीला वाचवण्यासाठी लोकांनी गर्दी केली. 


इमारतीतील लोकांनी आधी टेरेसवरून साडी खाली सोडली आणि या मुलीला वरती खेचण्याचा प्रयत्न केला. पण घाबरल्यामुळे ही मुलगी साडी पकडू शकत नव्हती. त्यामुळे त्यांना तिची सुटका करता आली नाही. त्यानंतर लोकांनी अग्नीशमन दलाला या मुलीची सुटका करण्यासाठी बोलवले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आधी शिडीच्या सहाय्याने मुलगी जिथे अडकली होती तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. पण शिडी चौथ्या मजल्याच्या खिडकीपर्यंत पोहचू शकली नाही.


त्यानंतर सचिन मांडवकर आणि कैलास पायगुडे हे अग्नीशमन दलाचे दोन जवान या पाच मजली इमारतीच्या टेरेसवर गेले आणि कमरेला दोर बांधून ते चौथ्या मजल्याच्या छज्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी त्या मुलीच्या कमरेलाही दोरी बांधली आणि ते मुलीला घेऊन शिडीवरून सुखरुप खाली उतरले.