पुणे : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर हेल्मेट सक्ती करायलाच हवी, मात्र गल्लीबोळात हेल्मेट नसेल तर पोलिसांनी कारवाई करू नये असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सुचवलंय. तर दूसरीकडे शक्य असेल त्यांनी हेल्मेट वापरावं अन्यथा मुख्य रस्त्यावर गाडी चालवू नये असा टोलाही त्यांनी लगावला. पुण्यात पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू झाली. यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगाही उगारला, तर पुणेकरांनी या हेल्मेट सक्तीला विरोधही केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ डिसेंबरला एकाच दिवसांत ५ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तर २०१८ वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात साधारण ३० हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. हेल्मेट विरोधी कृती समितीने संघर्षाचा इशारा दिलाय. हेल्मेट न वापरल्याने तुमच्यावर कारवाई होत असेल तर आमदाराला फोन करा असं आवाहन हेल्मेट कृती समितीने पुणेकरांना केलंय. हेल्मेटच्या नावाखाली पैसे उकळण्याचा पोलिसांचा धंदा असल्याचा आरोप कृती समितीने केलाय.


पुण्यात २०१७ साली ३०० तर २०१८ मध्ये २२५ जणांचा अपघातात मृत्यू झाला. पण पुणेकर मात्र आपल्या हेल्मेट न घालण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते आहे. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक आहे. पुणेकर भाजपाला निवडून देतात त्यामुळे हेल्मेटसक्तीचा आदेश काढणाऱ्या नितीन गडकरींचं पुणेकर ऐकतील, असा टोला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लगावला.