कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट खासदार झाल्याने हे पद रिक्त झाले आणि पिंपरी चिंचवड मधल्या नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. पण वारंवार तोंडाला पाने पुसली गेली असल्याने या वेळी तरी शहराला मंत्री पद मिळणार का याच चर्चा सुरु झाली. महापालिकेत २०१७ ला राष्ट्रवादीचा अभेद्य गड ढासळल्या नंतरच विजयाचे शिल्पकार ठरलेल्या शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप किंवा सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाची तरी मंत्रीपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती. पण वारंवार चर्चेत असून ही या दोघांना मंत्री पदाने हुलकावणी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झालं आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एकाला तरी मंत्री पद मिळावे अशी आशा स्थानिक नेते व्यक्त करत आहेत. महेश लांडगे हे अजून ही जाहीरपणे काही म्हणत नसले तरी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी वेळो वेळी एकाला तरी शहरात मंत्री पद मिळावे ही इच्छा बोलून दाखवली आहे. 


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत, त्यात अनेक दिग्गजांची नावे येत आहेत. त्यात पिंपरी चिंचवडच्या आमदारांचा विचार केला जाणार का, शहराला खरंच मंत्री पद मिळणार का या बाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार. पण विस्ताराच्या चर्चेच्या पार्शवभूमीवर शहराला पुन्हा मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत हे मात्र नक्की.