हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : पुणे जिल्ह्याच्या कदम वाकवस्ती गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत नराधम पतीने आपल्या पत्नी आणि मुलगा आणि मेव्हुण्यावर चाकू हल्ला केला. या चाकू हल्यात 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. नराधम बापाकडूनच मुलाची हत्या झाली तर पत्नी आणि मेव्हण्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगेश बसेरे हा 35 वर्षीय तरूण गेली अनेक वर्षांपासून आपली पत्नी गौरी मुलांसह कदम वाकवस्ती गावात वास्तव्यास होते. योगेशने गौरी सोबत आठ वर्षांपुर्वी विवाह केला होता. विटभट्टीवरती मजुरीचे काम करत गोडी गुलाबीने आपला सुखी संसार करत होते. पण या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. 


या सुखी संसारात योगेशची पत्नी गौरीचे परपुरूषाशी अनैतिक सबंध असल्याचा संशय पती योगेशला होता. आणि याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होवून खटके उडायचे आणि त्यामुळे योगेशची पत्नी गौरी ही गावातच पठारे वस्ती येथे राहत असलेल्या आपल्या भावाकडे भारत शिरोळेकडे दोन दिवसांपुर्वी रहायला गेली. त्यांना परत नेण्यासाठी रात्री योगेश गेला परंतू योगेशच्या डोक्यात मात्र भलतेच होते.



मेव्हणा भारतच्या घरी जावून पत्नी गौरीला गप्पा मारण्यासाठी ईमारतीच्या खाली बोलावले आणि मुलांसोबत बोलायचे असा योगेशने पत्नीकडे हट्ट केला.  मग गौरीने सहा वर्षांचा मुलगा आयुषला खाली आणले. यावेळी मुलगी झोपलेली असल्याचे गौरी पतीला सांगत असतानाच योगेशने अचानक खिशातून चाकू काढला आणि आपल्या पोटच्या मुलाच्या गळ्यावरती फिरवला. यानंतर 26 वर्षीय पत्नी गौरीवरही ही चाकूने सपापसप वार केले.


आपल्या बहीणीवर तिचा पती चाकू हल्ला करतोय हे पाहून मेव्हणा भारतही त्यांना वाचवायला आला. परंतू नराधम आरोपीने त्याच्यावरही चाकू हल्ला केला आणि तेथून निघून गेला आणि स्व:ता च्या गळ्या वरती चाकू फिरवला.  या दुर्दैवी घटनेमध्ये सहा वर्षाचा मुलगा जागीच तडफडून मृत पावला. तर पत्नी गौरी आणि मेव्हणा भारत तसेच आरोपी योगेश यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असून त्यांच्या वरती पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये नराधम आरोपीवर कलम 307, कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अनैतिक सबंधाचा राग मनात धरून नराधम आरोपीने आपले सुखी हसते खेळते कुटूंब उध्वस्त केले. जन्मदात्या बापाला आपला पोटचा मुलगाही कळला नाही यावरूनच राग माणसाचा किती मोठा शत्रु आहे हे स्पष्ट होते.