तक्रारींच्या पाढ्यानंतर पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट काढून घेतलं
पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचं उपचारासाठीचं दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे.
पुणे : पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचं उपचारासाठीचं दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. लाईफ लाईन या एजन्सीला याबाबत कंत्राट देण्यात आलं होतं. अनेक तक्रारी, रुग्णांची होणारी परवड आणि पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चौकशी बाबत विचारण्यात आलेला खुलासा, यावरून लाईफ लाईन एजन्सी चांगलीच गोत्यात आली होती. आणि त्याच दरम्यान एजन्सीच्या १२० डॉक्टर,नर्सिंग स्टाफने दिलेला राजीनामा यावरून लाईफ लाईन या एजन्सीचे काम थांबवून पालिकेककडे यांचं नियंत्रण देण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसह काही सरकारी स्टाफ नेमण्यात आला आहे.
पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधल्या याच अनागोंदी कारभाराच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चानं बुधवारी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी पीएमआरडीए अध्यक्ष सुहास दिवसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनावेळी दिवसे उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीची तोडफोड केली.
कोरोनाशी लढताना राज्यातल्या आरोग्य यंत्रणांचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. पुणे जिल्ह्यातल्या खानापूरच्या ४० वर्षीय गणेश तिकोने यांचा बेड आणि उपचारांअभावी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेचारपर्यंत तिकोनेंचा मृतदेह घरासमोरच पडून होता. प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. अखेर सरपंच, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि काही तरुणांनी अक्षरशः हातगाडीवरुन मृतदेह स्मशानभूमीत नेला.