पुण्यातलं जम्बो कोविड सेंटर बंद होणार... पण नंतर रुग्ण संख्या वाढली तर ...
पुणे शहरातील जम्बो कोविड सेंटर बंद होणार आहे. या कोविड सेंटरचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणून कोणत्याही नवीन रुग्णांना या
पुणे : पुणे शहरातील जम्बो कोविड सेंटर बंद होणार आहे. या कोविड सेंटरचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणून कोणत्याही नवीन रुग्णांना या कोविड सेंटरमध्ये दाखल करुन घेतलं जात नाहीय. आठशे खाटांची क्षमता असलेलं, हे पुण्यातील सर्वात मोठं जम्बो कोविड सेंटर आहे. सुरूवातीला हे एका खासगी कंपनीला दिलं होतं, पण सुसूत्रता आणि मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने ताब्यात घेऊन ते चालवण्याचा निर्णय घेतला. सध्या १३७ रूग्ण येथे उपचार घेत आहेत.
आता रुग्ण संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर चालवणे, त्यापेक्षा महाग होत आहे, यामुळे ते कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला खाटा कमी करण्याचा निर्णय होत होता, पण तरीही खर्चात तेवढा फरक पडत नसल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सेंटरमधील ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, बेड ही व्यवस्था साथ पूर्ण संपेपर्यंत कायम असणार आहे. कारण गरज पडल्यास किंवा रुग्ण संख्या वाढल्यास हे कोविड सेंटर सज्ज असणार आहे. फक्त मनुष्यबळाचा खर्च कमी करण्यासाठी तुर्तास जम्बो कोविड सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं महापालिका प्रशासनाने कळवलं आहे. जम्बो सेंटरला आतापर्यंत १०५ कोटी रूपये खर्च आला आहे.
कोरोनाची साथ संपेपर्यंत हे जम्बो कोविड सेंटर बंद केलं जाणार नाही, असं राज्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. पण आता मोठ्या प्रमाणात कोविडचे पेशंट येण्याची संख्या कमी झाल्याने हे जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे.
आता या कोविड सेंटरला दीडशे रुग्ण उपचार घेत आहेत. यानंतर पुढील उपचार हे महापालिका रूग्णालयात करण्यात येतील, उपचार थांबवले जाणार नाहीत, ते महापालिका किंवा राज्य शासनाच्या रुग्णालयात सुरु राहणार आहेत.
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील ६०० खाटांचं जम्बो कोविड सेंटर सुरु राहणार आहे, गरज पडल्यास किंवा जवळ असल्यास पुण्यातील रुग्णांना पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होवून उपचार घेता येणार आहेत.